हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.

नागपूरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) (NEERI), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च ॲंन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसि‍व्ह्वज ऑफ द पेट्रोलियम ॲंन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.

भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपूरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपूरजवळील कामठी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटाॅन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कोअर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाईन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या दगडापासून (zero milestone) केले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या गैर-शासकीय स्वयंसेवी संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार ह्यांनी १९२५ साली प्रस्थापित केले. मोहन मधुकर भागवत सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने ते पशुवैद्य आहेत.

हल्ली नागपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान विभागात जोर पकडत आहे. व्ही.आर.सी.ई. (Visvesvaraya Regional College of Engineering) म्हणजेच आताचे VNIT अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

टेलिफोन एक्स्चेंजला लागून एस टी पी आय (Software Technology Parks of India)ची स्थापना झाली असून तिथे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने Persistent Systems Limitedचा समावेश आहे.