लोकसभा आणि विधानसभा

नागपूर मध्ये एक लोकसभा मतदारसंघ व सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे :

  • नागपूर उत्तर
  • नागपूर दक्षिण
  • नागपूर पूर्व
  • नागपूर पश्चिम
  • नागपूर मध्य
  • नागपूर दक्षिण पश्चिम

हे सगळे मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात.

शहरी प्रशासन

नागपूरमध्ये १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली व त्यावेळेस नागपूरची लोकसंख्या ८२,००० एवढी होती. नागपूर मध्ये महानगरपालिकेची स्थापना मार्च,१९५१ साली झाली. नागपूर शहराचे व्यवस्थापन नागपूर महानगरपालिका करते. महानगरपालिकेचे सभासद महापौर व उपमहापौर यांची निवड करतात व ते महानगरपालिका चालवतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतो व तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो व त्याची निवड महाराष्ट्र शासन करते. नागपूर महानगरपालिकेचे काम हे वेगवेगळ्या विभागीय कार्यालयाद्वारे होते. नागपूरमध्ये दहा विभागीय कार्यालय आहेत, ते पुढील प्रमाणे :

  • लक्ष्मी नगर
  • धरमपेठ
  • हनुमान नगर
  • धंतोली
  • नेहरू नगर
  • गांधीबाग
  • सतरंजीपुरा
  • लकडगंज
  • आसी नगर
  • मंगळवारी

हे दहा विभाग १४५ प्रभागांमध्ये विभागल्या गेले आहेत. नगरसेवक हा प्रत्येक प्रभागाचा प्रमुख असून तो सार्वजनिक निवडणुकीद्वारे निवडला जातो.