मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, विधान भवन, जनरल पोस्ट आफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, इत्यादी अनेक शासकीय कार्यालये सिव्हिल लाइन्स भागात आहेत. सीताबर्डीत शहराची प्रमुख बाजारपेठ आहे सीताबर्डीचा मुख्य रस्ता खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात सिताबर्डी किल्ला आहे. धर्मपेठ (धरमपेठ)येथे मोठी दुकाने, उपहारगृहे व बाजारपेठ आहे. रामदासपेठेत अनेक कार्यालये व दुकाने आहेत. इतवारी येथे मालाच्या किरकोळ/घाऊक विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. महाल व ईतवारी हा शहराचा जुना भाग असून येथे छोट्या गल्ल्या असल्याने फार गर्दी असते. कळमना येथे संत्री, धान्ये व कृषी उत्पन्नाची मोठी बाजारपेठ आहे. लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, रामदासपेठ, बजाज नगर, सुरेंद्र नगर, नीरी, अजनी, तात्या टोपे नगर, खामला, शंकर नगर, धरमपेठ, सिमेंट रोड, कोर्पोरेशन कॉलनी या पश्चिम नागपूरमधील प्रसिद्ध वस्त्या आहेत. रामदासपेठ ह्या भागात भरपूर रुग्णालये आढळतात. आठ रस्ता चौकात आठ दिशातून आठ रस्ते येऊन मिळतात. नीरीच्या भल्या मोठ्या जंगलामुळे हिवाळ्यात येथे कमालीची थंडी पसरते.
येथील जाटतरोडी या परिसरातील बोरकरनगर येथे ‘गांधी विहीर’ आहे. महात्मा गांधी नागपूर येथे कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी आले आले त्यांनी ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली असे सांगण्यात येते. बाकी धनराशी ही लोकांच्या सहभागातून जमा झाली. ही विहीर केवळ १२ दिवसात खोदून पूर्ण झाली. यासाठी अनेक लोकांनी श्रमदानही केले