नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे.
नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात.
नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वांत वर असतो.उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असते आणि जरी पडले तरी शरीर पूर्ण झाकून बाहेर पडावे लागते. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४५° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३.५ सेल्सियस होते.