लोकसभा आणि विधानसभा
नागपूर मध्ये एक लोकसभा मतदारसंघ व सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे :
- नागपूर उत्तर
- नागपूर दक्षिण
- नागपूर पूर्व
- नागपूर पश्चिम
- नागपूर मध्य
- नागपूर दक्षिण पश्चिम
हे सगळे मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात.
शहरी प्रशासन
नागपूरमध्ये १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली व त्यावेळेस नागपूरची लोकसंख्या ८२,००० एवढी होती. नागपूर मध्ये महानगरपालिकेची स्थापना मार्च,१९५१ साली झाली. नागपूर शहराचे व्यवस्थापन नागपूर महानगरपालिका करते. महानगरपालिकेचे सभासद महापौर व उपमहापौर यांची निवड करतात व ते महानगरपालिका चालवतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतो व तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो व त्याची निवड महाराष्ट्र शासन करते. नागपूर महानगरपालिकेचे काम हे वेगवेगळ्या विभागीय कार्यालयाद्वारे होते. नागपूरमध्ये दहा विभागीय कार्यालय आहेत, ते पुढील प्रमाणे :
- लक्ष्मी नगर
- धरमपेठ
- हनुमान नगर
- धंतोली
- नेहरू नगर
- गांधीबाग
- सतरंजीपुरा
- लकडगंज
- आसी नगर
- मंगळवारी
हे दहा विभाग १४५ प्रभागांमध्ये विभागल्या गेले आहेत. नगरसेवक हा प्रत्येक प्रभागाचा प्रमुख असून तो सार्वजनिक निवडणुकीद्वारे निवडला जातो.